उन्हाळ्याची सुट्टी पावसाळ्याच्या आगमनाने संपू लागली की सगळंच कसं सुनंसुनं वाटू लागतं. पण सोबतच अनेक नव्या गोष्टींनी हे रितेपण भरून काढलं जातं. सुट्टीत गावाकडे आलेल्या सवंगड्यांची सोबत संपते नि नवे कपडे, कोरी पुस्तके, शाळेतले नवे सवंगडी यांचीही ओढ लागते. तशीच आंब्याचा हंगाम संपून त्याची चव उतरते नि ओढ लागते पावसाबरोबर तरारणाऱ्या विविध चवींच्या रानभाज्यांची!
पडलेले मागच्या हंगामाचे बी जणू येणाऱ्या पावसाची आतुरतेने वाटच पहात असते. जरा जरी शिडकावा झाला की लगेच जमीन हिरवीगार होते, नि दोन दोन पानं घेऊन टाकळा- कुरडूही आपले अस्तित्त्व दाखवू लागतात. काही दिवसांतच थोडी वर आल्यावर पावसाने उघडीप दिली की, टाकळ्याची कोवळी पाने खुडून आणण्याची घाई सुरू होते. सुट्टीच्या शेवटपर्यंत गावात राहणाऱ्या सवंगड्यांच्या बरोबरीने जंगलात, शेतात हुंदडण्याची मजा अनुभवता यते. टाकळ्याची लुसलुशीत कोवळी पाने काढण्याच्या निमित्ताने बाहेर फिरायचं, मधेमधे साठलेल्या पाण्यात अनपेक्षितपणे उडी मारून पाणी एकमेकांच्या अंगावर उडवायचं नि रानातला टाकळा खुडताना वनस्पतींच्या विश्वाची थोडी थोडी ओळख करून घेणं हे ही अनायासे होतं. ""ए ऽऽऽऽऽऽऽ कुठलीतरी पानं काढू नका रे. नुसता टाकळाच काढा. आणि भाजीसाठी काढा. जनावरांना चारा नाही घालायचाय! ही अशीा खरबरीत पानं आहेत ना, त्यां झाडांना हात लावू नका. नाहीतर नंतर दिवसभर सगळं अंग खाजवत बसाल. '' त्यातल्या त्यात जो थोरला असतो त्याचं दादागिरीवजा मार्गदर्शन ऐकत, एकमेकांच्या खोडया करत पानं खुडून जमा करायची. ""कुठलं, कुठलं झाड?'' म्हणत कुतुहलाने त्या झाडाला समजून घेण्यासाठी धडपडायचं ते काही साध्या सरळ उद्देशानं नाही, तर त्याचा प्रयोग कुणावर करायचा त्याच्या युक्त्या डोक्यात घेऊनच. बऱ्याचदा असे प्रयोग घरच्या वासरांवर- रेडकांवर व्हायचे नि त्यांना काहीच कसं होत नाही , याचं आश्चर्यही वाटायचं. ""अरे टाकळ्याबरोबर कुरडूचा पालासुद्धा मिळाला तर बघा. म्हणजे कडू भाजी खायला लागणार नाही.'' ही ज्ञानात अजून एक भर! टाकळ्याचा कडवटपणा घरातल्या उपदेशांच्या जोडीने गल्याखाली उतरवावा लागणार याची तेव्हाच जाणीव होते नि चिमुकले खोडकर हात टाकळ्याऐवजी कुरडूलाच जास्त शोधत राहतात. तिथल्याच कातळावर "आढावा बैठकीत' कुणी कि
ती भाजी मिळवली, त्यात गवत किती नि हवी ती पानं किती याचा हिशेब होतो. प्रत्येकाला, ""मी बघ किती भाजी जमा केली. '' म्हणायला जागा मिळते नि एखाद्याला नाही जमलं तर आपल्याकडची थोडी पानं "दान'ही केली जातात.
घरी आल्यावर हे सर्व गृहलक्ष्मीच्या ताब्यात देऊन शाबासकी मिळवून बाकीचे खेळ खळायला मोकळे. पुन्हा त्याची आठवण होते, ती पानावर बसल्यावरच. ""नको मला ती कडू भाजी!'' म्हणत नाकं मुरडायची नि घरातल्या मोंया व्यक्तीने, ""अशा भाज्या हंगामात एकदातरी खायच्या . पोटाला बऱ्या असतात. वाढ गं ताटात थोडी भाजी. आणि पहिलं वाढलेलं सगळं संपलं पाहिजे बरंका.'' म्हणत खायला लागणाऱ्या फणसाच्या आठ ळ्यां नि खोबऱ्याच्या चवाने वाढवलेली भाजीची चव काही काळातच अंगवळणी पडते. नंतर तर यंदा भाजी खायला मिळाली नाही म्हणून रुखरुखही लागून राहते.
पावसाच्या पाण्याबरोबर अजूनही काही वनस्पती रानातून घरात यायला लागतात. छोट्या लिलीसारखी दिसणारी फोडशी नि मोठ्या लिलीच्या पानांसारखी काकवी, गिळगिळीत घोळ, कुड्याच्या प्रचंड कडू शेंगा भाजणी, कांदा, ओले खोबरे यांच्याशी संगनमत करून चविष्ट होऊन पानात दिसू लागतात. हळू हळू पाऊस जसा स्थिरावतो तशी आधीच्या भाज्यांची जागा नव्या भाज्यांनी घेतलेली असते. झाडाच्या बुंध्यावर, किंवा दगडी बांधांवर उगवणारे रुखअळू असो की जांभळट छटेची मखमली गोविळीची पानं असोत, ती घरात दिसली की दुसऱ्या दिवशी अळूवड्याची मेजवानी घडणारच. मुळात ही पाने खरे अळू नसल्याने अळवाच्या खाजेचा तर विचार बाजूलाच पडतो पण त्यांचा लुसलुशीतपणा खऱ्या अळूच्या वड्यांचा विसर पाडतो.
पाऊस स्थिरावला की सगळ्याच वनस्पती वाढीला लागलेल्या असतात. सुरवातीला सगळी सारखीच वाटणारी दोन पानं जाऊन त्या त्या वनस्पतीच्या वैशिष्ट्याप्रमाणे विविध आकारांची पाने दिसू लागतात. रोपांची झुडपे नि वेली होऊन रानात एकत्रित वाढू लागतात. त्यांच्यामधून भिरंबोळ्याची वेल शोधायची नि तिचा कंद खोदून काढायचा हा "जाणकार' मुलांचा मेवाच. रताळ्यासारखा गोड लागणारा हा कंद शक्य असेल तर तिथल्या जवळच्याच स्वच्छ ताज्या पाण्याने धुवून तिथेच खायचा. नाहीतर मातीच्याच हाताने अलगद सोलून त्याला माती लागणार नाही अशा रीतीने खाऊन आधी पानांना नि मग कपड्यांना हात पुसून मोकळे व्हायचे! तावडीतून वाचलेल्या काही वेली कालांतराने चवळीसारख्या शेंगा द्यायला लागतात, त्याही खाण्यात तितकीच मजा असते. बांधावर येणारी आंबटी असो की शेतात तण म्हणून येणारी आंबोशी, चिंचेच्या पानांसारखीच ही छोटी आंबट झाडे तिथल्या तिथे खाऊन उरलीच तर चटणीसाठी घरी नेली जातात.
हळूहळू आसमंत फुलांनी भरायला लागलेला असतो. रंगीबरंगी गुलाबी जांभळट फुले रानात दिसायला लागतात. त्यातली फिक्कट जांभळ्या तुऱ्यांनी बहरलेली भारंगी कोणाचेही लक्ष वेधून घेतेच, पण रानभाज्यांच्या जाणकाराचे हातही त्यामुळे शिवशिवायला लागतात. अलगद केवळ फुले काढून ती एकत्र करून ,""फुलं ताजी आहेत तोपर्यंत लवकर भारंगीची भाजी होऊन जाऊ दे.'' म्हणून चविष्ट फर्मानही सुटते नि पुढच्या जेवणाला ती मिळूनही जाते. रानभाज्यांच्या विश्वाला या नाजूक फुलाचंही वावडं नाही. करिंदे , घोरकंदासारखे कंद असोत, की रानातली नाजूक पांढरी अळंबी , आपापल्या वैशिेट्यांनी गावाकडच्या चवींचं जग समृद्ध करतात. अन् मागे ठेवतात समृद्ध आरोग्याची देणगी. सोबतच पुढच्या पावसाची मनापासून नव्हे तर जिभेच्या उगमापासून वाट पहायला लावतात.
बुधवार, सप्टेंबर २०, २००६
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
४ टिप्पण्या:
kharay tumacha!!
shakya asel tar yanchya krutihi dya na!!!
Rochin
sure!
My next post will be regarding it....
means not exactly
but one can get idea
-Durga Moghe
Chhanach ho!
Chhanach ho!
टिप्पणी पोस्ट करा